रेयाल पुणे युनायटेड, कमांडो, सिटी पोलिसची आगेकूच
- महिला विभागात अस्पायर एफसी, पुणे वॉरियर्सचा विजय
- रेयालच्या विजयात मयांक चतुर्वेदीची हॅटट्रिक
पुणे - २६ जुन २०२२ - रेयाल पुणे युनायटेड, कमांडो, सिटी पोलिस, अस्पायर एफसी आणि पुणे वॉरियर्स चमकदार विजय मिळवून येथे सुरू असलेल्या पीडीएफए लीग स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली.
प्रथम श्रेणीतील सामन्यात रेयाल पुणे युनायटेडने आजचा सर्वात मोठा विजय मिळविला. त्यांनी अ गटातील सामन्यात आर्यन्सचा ५-१ असा पराभव केला. मयांक चतुर्वेदी याने हॅटट्रिक साधताना १३, ५० आणि ५६व्या मिनिटाला गोल केले. स्वप्निल पवारने १४ आणि मोहित देवरे याने ५८व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय मोठा करण्यात आपला वाटा उचलला. आर्यन्सकडून नईम सय्यद याने ६६व्या मिनिटाला गोल केला.
सी गटात कमांडोने दोन्ही सत्रात एकेक गोल करत टायगर कंबाईनचा २-० असा पराभव केला. अनिकेत पवारने १२, तर हृषिकेश चव्हाण याने ६३व्या मिनिटाला गोल केला.
ब गटातील सामन्यात सिटी पोलिसने रेंजहिल्सचे आव्हान २-० असे सहज मोडून काढले. योगेश वाव्हळ याने ३२, तर संदीप लाडकर याने ५७व्या मिनिटाला गोल केला.
महिला लिगमधील सुपर ६ गटात अस्पायर एफसीने पहिला विजय मिळविला. त्यांनी सिटी गर्ल्स गो स्पोर्टसचा २-१ असा पराभव केला. मुरीएल अॅडम हिने सातव्याच मिनिटाला अस्पायरचा गोल केला. त्यानंतर भक्ती बिरांगडी हिने २५व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली. गो स्पोर्टसचा एकमात्र गोल अस्मी कुलकर्णी हिने ५३व्या मिनिटाला केला. अस्पायरचे चार गुण झाले असून गो स्पोर्टसचा हा दुसरा गोल ठरला.
निकाल -
सिटी स्पोर्टस अरेना, मोशी - प्रथम श्रेणी
गट सी - कमांडो २ (अनिकेत पवार १२वे, हृषिकेश चव्हाण ६३वे मिनिट) वि.वि. टायगर कम्बाईन ०
गट अ - रेयाल पुणे युनायटेड ५ (मयांक चतुर्वेदी १३, ५०आणि ५६वे मिनिट, स्वप्निल पवार १४वे, मोहित देवरे ५८वे मिनिट) वि.वि. आर्यन्स १ (नईम सय्यद ६६वे मिनिट)
गट ब - सिटी पोलिस २ (योगेश व्हाव्हळ ३२वे, संदीप लाडकर ५७वे मिनिट) वि.वि. रेंज हिल्स रंग बॉईज ०
एसएसपीएमएस मैदाना - महिला लिग - सुपर ६
अस्पायर एफसी २ (म्युरिएल अॅडम ७वे, भक्ती बिरांगडी २५वे मिनिट) वि.वि. सिटी स्पोर्टस गो स्पोर्टस १ (अस्मी कुलकर्णी ५३वे मिनिट)
उत्कर्ष क्रीडा मंच अ ० बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन ०
पुणेरी वॉरियर्स २ (किर्ती गोसावी ४३वे मिनिट, ऐश्वर्या जगताप ६१वे मिनिट) वि.वि. स्निग्मय एफसी ०