डेक्कन इलेव्हन, रेंजहिल्सचे संघर्षपूर्ण विजय

डेक्कन इलेव्हन, रेंजहिल्सचे संघर्षपूर्ण विजय
पुणे - पीडीएफएच्या नव्या मोसमातील प्रथम श्रेणीच्या सामन्यात आज संघर्षपूर्ण लढती बघायला मिळाल्या. डेक्कन इलेव्हन आणि रेंजहिल्स यंग बॉईज संघांना विजयासाठी झगडावे लागले.
मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे झालेल्यालढतीत डेक्कन ब संघाने सी गटातील सामन्यात टायगर कंबाईनचा १-० असा पराभव केला. सामन्यातील एकमात्र गोल गौरव गाबा याने ५१व्या मिनिटाला केले. 
त्यानंतरच्या सामन्यात रेंजहिल्स यंग बॉईज संघाने ब्ल्यू स्टॅग संघाला २-१ असे पराभूत केले. प्रयत्नपूर्वक खेळ करून ब्लू स्टॅगने सामन्यात बरोबरी आणली होती. मात्र, अतिरिक्त वेळेत त्यांना आपला बचाव अभेद्य ठेवता आला नाही. त्यांचा गाफिलपणा त्यांना महागात पडला आणि शंशाक यादव रेंजहिल्ससाठी हिरो ठरला. 
शंशाकनेच सामन्याच्या २२व्या मिनिटाला रेंजहिल्सचे खाते उघडले होते. याच आघाडीवर त्यांनी विश्रांतीपर्यंत वर्चस्व राखले. मात्र, उत्तरार्धात तिसऱ्याच म्हणजे सामन्याच्या ४३व्या मिनिटाला सचिन चंडेल याने गोल करून ब्लू स्टॅगला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर ब्लू स्टॅगच्या खेळाडूंनी प्रयत्नपूर्वक ही बरोबरी सांभाळली होती. मात्र, सामन्याच्या अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या मिनिटाला शंशाकने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा विजयी गोल केला. 
दिवसातील अखेरच्या सामन्यात डी गटात डेक्कन डी संघाने रेंजहिल्स मिलानचे आव्हान २-१ असे परतवून लावले. 
सौरभ शिंदे याने सामन्याच्या १०व्या मिनिटाला गोल करून डेक्कनला आघाडी मिळवून दिली.त्यानंतर त्यांनी ही आघाडी टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. सामन्याच्या संदेश सरोदे याने ६६व्या मिनिटाला गोल करून रेंजहिल्स मिलानला बरोबरीवर आणले. मात्र, अखेरच्या टप्प्यात ७७व्या मिनिटाला शंकर खोर्लागडे याने गोल करून डेक्कनचा विजय साकार केला. 
निकाल -
सिटी स्पोर्टस अरेना, मोशी - प्रथण श्रेणी
गट सी - डेक्कन इलेव्हन ब १ (गौरव गाबा ५१वे मिनिट) वि.वि. टायगर कंबाईन ०
गट डी -रेंजहिल्स यंग बॉईज २ (शशांक यादव २२ आणि ८२वे मिनिट) वि.वि. ब्लू स्टॅग (सचिन चंडेल ४३वे मिनिट)
डेक्कन इलेव्हन डी २ (सौरभ शिंदे १०वे मिनिट, शंखर खोर्लागडे ७७वे मिनिट) वि.वि. रेंजहिल्स मिलान १ (संदेश सरोदे ६६वे मिनिट)