आता नजरा कुमार हॉकी विश्वकरंडकाकडे

आता नजरा कुमार हॉकी विश्वकरंडकाकडे
©Hockey India

कोविड १९ची मार्गदर्शक तत्वे प्रमुख संघांची माघार यानंतर आता कुमार विश्वकरंडक स्पर्धेला उद्यापासून सुरवात होत आहे. केवळ हॉकीप्रेमीच नाही, तर गेल्या आठवड्यापर्यंत टी २० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेकडे लागलेल्या क्रीडा प्रेमींच्या नजराही आता या विश्वकरंडक स्पर्धेकडे वळणार आहेत.

सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी भारतावर आली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये लखनौ येथे ही स्पर्धा पार पडली होती. भारत या स्पर्धेचा विजेता होता. हे विजेतेपद टिकविण्याचे आव्हान भारतीय कुमारांसमोर आहे. या स्पर्धेला दुसरे महत्व म्हणजे भारताच्या वरिष्ठ संघाच्या ऑलिंपिक यशानंतर ही स्पर्धा होत आहे. या यशाने भारतीय कुमार निश्चित प्रेरित झाले असतील यात शंका नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे ही नुसती कुमारांची विश्वकरंडक स्पर्धा नाही, तर हा तमाम हॉकी विश्वाचा भविष्यकाळ आहे. हॉकीची नवी पिढी ही स्पर्धा घडवणार आहे.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संघाचेच देता येईल. चार वर्षापूर्वीच्या म्हणजे २०१६च्या स्पर्धेत भारतीय संघ विजता ठरला होता. त्यानंतर भारतीय वरिष्ठ संघाने टोकियो ऑलिंपिकस्पर्धेत ४१ वर्षांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली. हे कसले उदाहरण असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. भारतीय ऑलिंपिक संघातील नऊ खेळाडू हे २०१६ कुमार विश्वकरंडक संघातील होते. त्यामुळेच आता देखिल या संघाकडे उद्याचे वरिष्ठ खेळाडू म्हणून बघितले गेले तर आश्चर्य वाटायला नको.

सर्वाधिक सहा वेळा विजेतेपद मिळविलेल्या जर्मनीचे आव्हान सर्वांसमोर असेल यात शंका नाही. पण, त्याच वेळी बेल्जियम आणि भारत यांच्या आव्हानाला विसरता येणार नाही. हे दोन्ही संघ देखील परिपूर्ण तयारी करूनच उतरले आहेत. त्यातही पाकिस्तान संघ सहभागी झाल्याने तमाम क्रीडा प्रेमींच्या मनात भारत-पाक लढतींचे पेव फुटू लागले आहेत. बाद फेरीतच हे दोन देश समोरासमोर येणार असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. असो, हे सर्व येणारी वेळच ठरवेल. आपण सामन्यांचा आनंद घ्यायचा.

आव्हान आयोजनाचे

कोविड संकटकाळात ही स्पर्धा होत आहे. कोविडचे संकट अजून पूर्णपणे संपलेले नाही. अनेक अटी शर्थींचे पालन करून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. मुख्य म्हणजे सप्टेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन भारताला मिळाले. इतक्या कमी वेळात ओडिशा सरकारने आयोजनाचे शिवधनुष्य पेलले आहे. भारतीय संघाला दिलेले पुरस्काराचे दायित्व त्यांनी आणखी वाढवले.त्याचबरोबर कलिंगा स्टेडियम उभारून त्यांनी ओडिशा आता हॉकी हब बनू पाहत असल्याचे संकेत दिले. अनेक महत्वाच्या स्पर्धेंचे यजमानपद अनुभवणाऱ्या ओडिशा हे शिवधनुष्य लिलया पेलणार यात शंकाच नाही. आपल्याला काहीच अवघड नाही. एकदा का करायचे म्हटले की ते पूर्णत्वापर्यंत करायचे ही आपली परंपरा. ओडिशा सरकाने ही इच्छाशक्ती दाखवली आहे. अशी इच्छा शक्ती भारतीय कुमारांनी दाखवायची आहे. आपल्याला पुन्हा जिंकायचे आहे. ऑल दि बेस्ट..!